मंगळवार, २१ जून, २०११

पाश


 
***
सोडुनी आलो दुरवर येथे
नाही मुल्य भावनांस जेथे

काळानेच साधिला डाव हा सारा
सुटला सर्व तो नात्यांचा पसारा
मंद गती ती स्मृतिभ्रंशाची
कारण त्यांस इथली संस्कृती
दोष न दिसे तिचा ही तसा
जोपासली मी तिजं मनातुन येथे..
नाही मुल्य भावनांस जेथे
सोडुनी आलो, दुरवर येथे

वाटे मजला अता यावे परतुनी
कळेना कसा हा भाव आटला
संवेदनांना आतला मार्ग दाखविला
पैशांसाठी पैश्यानेच देश सोडविला
'स्नेह भाव' असे दर्शन न मिळे
जगती माणसे अर्थालाच येथे...
नाही मुल्य भावनांस जेथे
सोडुनी आलो, दुरवर येथे

मोडुनी करार झुगारुन ही बंधने
पुन्हा चारही ॠतुंना बिलगेन मी
मुक्त होउनी या 'मोह पाशा'तुन
माय देशी परतेन मी
माय देशी परतेन मी

*
- चातक
१५०५२०११

गुरुवार, ९ जून, २०११

आज 'सागर' गोड जाहले..

***
फेर धरला वार्‍याने दाटुनी आले आभाळं
मळभ साचला वातावरणी, धावुन आली शितलहर
सोसाट्याच्या वार्‍याने उडाले ते छत बावरुनी
धुळ्-केराने गिरक्या घेतल्या
झाडे-झुडुपे झाली नतमस्तक...
पाहुनी नभी अवाढव्य काळे हत्ती
प्राणी मात्रांत पसरली एक भिती
अकस्मात हे आज घडले
सुर्याने ही तोंड लपविले
भरदुपारी अंधारुन आले
होते नव्हते सगळे धावपळीला लागले..
विद्युलता ती कसली भिती तिज
काळ्यामधुनी ती 'शुभ्र' चमकली
मेघांच्या गर्भातुनी, अवकाशाच्या कवेतुनी
माणिक-मोत्यांची क्षणांत सुटका झाली...
पाहताक्षणी 'धरे'ला त्यांनी घर आपले ओळखिले
स्वःअस्तित्त्व त्या मोत्यांनी या मातीला समर्पिले
दरवळ दरवळ दरवळले
चैतन्य एक चौफेर उधळले
मातीतुनी आज 'खार' मिठागर
गोड हासले..
आज 'सागर' गोड जाहले.. स्मित
***
- चातक. ०५०६२०११